खानापूर आगार प्रमुखांना ग्रामस्थांसह विद्यार्थीवर्गाकडून निवेदन
वार्ताहर/नंदगड
नंदगड भागातील विद्यार्थ्यांचे व प्रवासीवर्गांचे हाल पाहून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात नंदगड-बेळगाव बसफेरी सुरू करण्यात आली होती. या बसला मुबलक प्रवासी व विद्यार्थी होते. त्यामुळे तब्बल सात ते आठ महिने सर्व काही व्यवस्थित चालले होते. परंतु काही दिवसांपासून ही बसफेरी बंद करण्यात आली. त्यामुळे नंदगड पोलीस स्टेशनजवळील बसथांब्यावर बराचवेळ बसच्या प्रतीक्षेत विद्यार्थी थांबत आहेत. शाळा, कॉलेजला वेळेत विद्यार्थी पोहचत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची गंभीर दखल घेऊन कसबा नंदगड ग्रा. पं.चे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भागातील जनतेने खानापूर बस आगारप्रमुख संतोष बेनकनकोप यांना निवेदन दिले आहे.
नंदगड क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळ्यापासून गतवर्षीप्रमाणे सकाळी 9.15 वाजता बसफेरीला सुरुवात करावी. हेब्बाळ, लालवाडी, नावगा, कौंदल, करंबळ, खानापूरमार्गे पुढे बेळगावपर्यंतची सोय करावी. त्यामुळे खानापूर व बेळगाव येथे शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खानापूर बस आगारप्रमुख संतोष बेनकनकोप यांनी निवेदन स्वीकारून लवकरच या बसफेरीला सुरुवात करणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना ग्रा. पं. माजी सदस्य आप्पाजी पाटील, सुरेश करडी, ओमकार बेतगावडा, वसंत ओऊळकर, मंथन पाटील, विश्वनाथ हलगेकर आदींसह अनेक नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.









