बेळगाव : गजाननराव भातकांडे स्कूलच्या बाजूला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, ओला व सुका कचरा टाकला जात असला तरी संबंधितांवर महापालिकेकडून कारवाई होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे शालेय विद्यार्थी व या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांना नाकावर रुमाल धरून ये-जा करण्याची वेळ आली आहे. यामुळे महापालिकेने याकडे लक्ष घालून कचरा समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली जात आहे. महापालिकेकडून स्वच्छ व सुंदर बेळगाव बनवण्याचा नारा दिला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. अद्यापही काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट कायम आहेत.
नागरिक जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा फेकून देत आहेत. भातकांडे शाळेजवळ गेल्या काही महिन्यांपासून कचरा टाकून देण्याचे प्रमाण वाढले आहे. सदर ठिकाणी कचरा टाकू नये, यासाठी महापालिकेने त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यासह संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे कचऱ्याच्या उकिरड्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. या समस्येमुळे शालेय विद्यार्थी व स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने कचऱ्याची उचल करून त्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.









