वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-राजवाडा येथील हरिजन वाड्यानजीकच्या विद्युतवाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वीजवाहिन्यांवर पडलेला वृक्ष हेस्कॉमने त्वरित हटवावा, अशी मागणी होत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी या परिसरात झालेला मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जांबोटी-राजवाडा व हरिजनवाड्या दरम्यान असलेल्या रहदारीच्या रस्त्यावरून गेलेल्या वीजवाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडल्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. सध्या या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असला तरी अचानक वीजपुरवठा सुरू झाल्यास अनर्थ घडण्याची शक्यता आहे. तसेच वीजवाहिन्या रस्त्यावर तुटून पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी खानापूर उपविभाग हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकारी व जांबोटी ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून, जांबोटी-राजवाडा येथील वीजवाहिन्यांवर पडलेला वृक्ष त्वरित हटवावा, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.









