परिसरातील नागरिकांना करावा लागतोय दुर्गंधीचा सामना
बेळगाव : शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. तांबिट गल्ली, होसूर येथे गटारीतून काढण्यात आलेला कचरा महापालिकेचे सफाई कामगार टाकत आहेत. त्यामुळे तांबिट गल्ली कॉर्नरवर मिनी कचरा डेपो निर्माण झाला आहे. याचा फटका स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत असून महापालिकेने याकडे लक्ष देऊन येथील ब्लॅकस्पॉट हटवावा, अशी मागणी केली जात आहे. शहरातील कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्याची ओरड कायम आहे. एकीकडे शहरातील ब्लॅकस्पॉट हटविले जात आहेत, असे सांगितले जात असले तरी दुसरीकडे मात्र विविध ठिकाणी नवीन ब्लॅकस्पॉट तयार होत आहेत. त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.
ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी प्लास्टिक ओला, सुका व इतर प्रकारचा कचरा फेकून दिला जात आहे. कचऱ्याच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. बसवाण गल्ली, होसूर येथील पिंपळकट्टानज् ााrक असलेल्या तांबिट गल्ली कॉर्नरवर महापालिकेचे कर्मचारी परिसरातील कचरा गोळा करून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरवत आहेत. मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग आठ-दहा दिवस एकाच ठिकाणी पडून रहात आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. कचरा रस्त्यावर आला असल्याने कचऱ्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. स्थानिक नगरसेवकांकडे याबाबत अनेक वेळा तक्रार करूनदेखील कचऱ्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष घालून येथील ब्लॅकस्पॉट हटविण्याची सूचना करावी, अशी मागणी केली जात आहे.









