बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने अनसूरकर गल्ली येथे नवीन गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर काँक्रिट घालण्यात आले नसल्याने सदर गटारी धोकादायक बनल्या आहेत. स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महापालिकेकडून गटारीवर फरशी घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, फरशा व्यवस्थितरित्या घातल्या जात नसल्याने या मार्गावरील गटारी धोकादायक बनल्या आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी अनसूरकर गल्लीतील एका बाजूच्या गटारी नव्याने बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर काँक्रिटच्या गटारी करण्यात आल्या आहेत. मात्र, सदर काम करण्यास बराच विलंब लावण्यात आल्याने याचा नाहक त्रास स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांना सहन करावा लागला. स्थानिक नगरसेवक व ठेकेदाराने गटारीचे काम अशास्त्राrय पद्धतीने केले असल्याचा आरोप केला जात आहे.
गटारीची खोली अधिक असून रस्त्यापासून गटारी उंच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील पाणी गटारीत वाहून जाण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अनेकवेळा नगरसेवकाकडे तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना गटारी झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. खरेतर गटारीवर काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. पण ठेकेदाराकडून घाईघाईने फरशा घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर फरशा एकमेकाला लागून बसविण्याऐवजी मनमानी पद्धतीने कोठेही बसविल्या जात आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. याकडे मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गटारीवर काँक्रिट घालावे. तसेच ठिकठिकाणी चेंबर सोडण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.









