बेळगाव : बेंगळूर येथील शिवाजीनगर हे थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारसाशी जोडलेले आहे. नुकतेच या भागातील मेट्रोचे काम पूर्णत्वास आले असून शिवाजीनगर येथे मेट्रो स्टेशन निर्माण करण्यात आले आहे. या स्टेशनचे छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्याची मागणी होत असताना राज्य सरकारने मात्र सदर स्टेशनचे सेंट मेरी नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. असे न करता राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव स्टेशनला देण्याची मागणी श्रीराम सेना हिंदुस्तानच्यावतीने करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत. मेट्रो स्टेशनचे नाव इतर नावांशी जोडले गेल्यास बेंगळूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाहीशी होऊन असंख्य नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जाणार आहेत. राज्य सरकारने स्वराज्य, न्याय व सर्व धर्मियांसाठी लढणाऱ्या शिवाजी महाराजांना सन्मान द्यावा, अनावश्यक वाद निर्माण न करता भावी पिढ्यांना महापुरुषांच्या कार्याने प्रेरित करा. यासाठी मेट्रो स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्याची मागणीही करण्यात आली.









