कर्नाटक समता सैनिक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कारवार जिल्ह्यातील मोगेर या प्रवर्ग 1 मध्ये येणाऱ्या जातीला असणारे आरक्षण कमी करण्यात येणार आहे. यावर कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप मागविला असून सदर जातीला असणारे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक समता सैनिक दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यातील कारवार जिल्ह्यासह इतर भागामध्ये मोगेर या जातीचे लोक अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत. त्यांच्या जात गणणेनुसार त्यांना अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. सदर जातीला असणारे आरक्षण कमी करण्यासाठी कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकटन जाहीर केले आहे. यावर आक्षेप नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मोगेर जातीचे नागरिक कारवार जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसाय करतात. सदर जातीला पूर्वीप्रमाणेच आरक्षण कायम ठेवण्यात यावे. आरक्षणाच्या यादीमधून त्यांना कमी करण्यात येवू नये, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.









