मार्कंडेय नदीच्या दुतर्फा मातीचे ढिगारे : वेळीच उचल करण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगाव परिसरातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील ‘रोहयो’ अंतर्गत नदीतील गाळ, माती काढण्याच्या कामाला गेल्या महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. सदर माती मार्कंडेय नदीच्या दुतर्फा ढिगारे मारून ठेवल्याने यानंतर येणाऱ्या पावसाळ्यातील पाण्याच्या जोरदार पुरामुळे सदर माती पुन्हा मार्कंडेय नदीच्या पात्रातच जाणार यात शंकाच नाही. मग सदर नदीच्या पात्रातील काढलेला गाळ, माती याचा काय उपयोग झाला, अशी विचारणा या भागातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
गेल्या महिनाभरापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत उचगाव परिसरातील 17 ते 18 गावातील महिला मार्कंडेय नदीच्या पात्रातील माती, गाळ काढण्याचे काम करीत आहेत. सदर माती मार्कंडेय नदीच्या दोन्ही काठावर ढिगारे मारून ठेवण्यात आली आहे. हे ढिगारे न करता सपाट करून लांबवर पसरवली असती तर चालले असते. मात्र काठालगतच मोठमोठे ढिगारे मारून ठेवल्याने पावसाच्या पाण्याच्या जोरदार झोतामुळे आणि वेगामुळे पुन्हा नदीच्या पात्रात जाणार व नदीचे पात्र जैसे थे होणार आहे. यामुळे शासनाने या रोहयो अंतर्गत केलेला प्रचंड खर्च पुन्हा वाया जाणार आहे, अशी चर्चा नागरिकांतून करण्यात येत आहे. अद्याप मुसळधार पावसाला प्रारंभ झालेला नाही. मार्कंडेय नदीचे पात्रही कोरडे असून यातून पाणीही अजून वाहत नाही. शासनाने तातडीने नदीकाठी टाकलेले मातीचे ढिगारे लवकरात लवकर हलवावे, तरच केलेल्या या कामाचे चीज होईल, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. सदर माती वाळूमिश्रित असल्याने रस्त्याच्या कामासाठी अथवा नागरिकांना कोणालाही हवी असेल तर ती घेऊन जाण्याची परवानगी शासनाने द्यावी. तसेच इतर रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांना हवी असेल तर ती द्यावी, अशी सूचनाही नागरिकांकडून करण्यात येत आहे.









