आमदार विठ्ठल हलगेकर यांची बस आगार व्यवस्थापकांना मागणीची पूर्तता करण्याची सूचना
वार्ताहर /नंदगड
गोदगेरी क्रॉसपासून अवघ्या अर्धा कि. मी. अंतरावर गोधोळी गाव असूनही या गावाला बस जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. परंतु गोधोळीपर्यंत बस सोडा, ही मागणी गेल्या दहा वर्षापासून करण्यात येत होती. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार तसे आपले निवेदन आगार व्यवस्थापकांना दिले. ग्रामस्थांनी ते आगार व्यवस्थापकांकडे सुपूर्द केले. लागलीच आगार व्यवस्थापक महेश तिरकन्नावर यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार क्रॉस ते गोधोळी गावच्या बसथांब्यापर्यंत जाऊन पाहणी केली. व लवकरच गोदगेरी बस गोधोळी गावापर्यंत सोडण्याचे आश्वासन दिले. धारवाड-पणजी महामार्गावर गोधोळी गाव आहे. या गावची लोकसंख्या सुमारे 4 हजार आहे. गावात प्राथमिक, माध्यमिक शाळा, ग्रा. पं. कार्यालय आहे. आसपासच्या परिसरातील गावचे लोक गोधोळी येथे येऊन पुढे बसने अन्यत्र जातात. त्यामुळे गोधोळी बसथांब्यावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. बेळगाव व खानापूर आगारातून नंदगड, नागरगाळीमार्गे गोदगेरीपर्यंत सकाळ, सायंकाळ व दुपारच्या बसफेऱ्या असतात. त्यामुळे या भागातील प्रवासीवर्गाची चांगली सोय झाली आहे. मात्र गोदगेरी क्रॉसपासून अवघ्या अर्धा कि. मी. ते ही महामार्गावर असलेल्या गोधोळी गावच्या बसथांब्यापर्यंत बस येत नसल्याने गैरसोय होत होती. गोधोळीपर्यंत बस नेण्यात यावी, यासाठी गेल्या दहा वर्षापासून अनेकवेळा मागणी करण्यात आली. निवेदने देण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्षच होत होते. आमदार विठ्ठल हलगेकर निवडून येताच या भागातील भाजपचे नेते मनोहर कदम, नागाप्पा मिटगार, राजू रपाटील, मारुती हरिजन, शिवानंद गोधोळी व अन्य नागरिकांनी आमदार हलगेकर यांची भेट घेऊन बसची समस्या मांडली. लागलीच आमदारांनी आगार व्यवस्थापकांना यासंबंधी पत्र दिले. सदरचे पत्र वरील नेत्यांनी व्यवस्थापकांना देऊन त्यांना गोधोळी येथे घेऊन गेले. आगार व्यवस्थापक महेश तिरकन्नावर यांनी गोधोळीला भेट देवून बस गोधोळी गावापर्यंत नेण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले.









