वार्ताहर/उचगाव
पश्चिम भागामध्ये शेतकरी शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसायातून चांगला आर्थिक फायदाही होतो. म्हैस दूध दर परवडणारा आहे. पण गायीच्या दुधाचे उत्पादन अधिक असूनदेखील दुधाला दर कमी आहे. हा दर परडणारा नसल्याने शासनाने गाईच्या दुधाला दर वाढवून द्यावा, अशी मागणी या भागातील शेतकरी, दूध उत्पादकातून करण्यात येत आहे. शेतीतून मिळणाऱ्या पिकांच्या उत्पादनातून वर्षाकाठी शेतकऱ्याच्या हातात पैसा येतो. मात्र दुग्ध व्यवसायातून आठवड्याला आणि महिन्याला दुधाच्या बिलाचे पैसे मिळत जातात. त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी व घर खर्च चालवण्यासाठी, गोरगरीब शेतकरी, दूध उत्पादकाला दुग्ध व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र म्हैस आणि गाय यामध्ये तुलना केली असता म्हैशीच्या दुधाला मिळणारा दर फॅटनुसार परवडणारा असतो. मात्र गाईच्या दुधाला फॅट लागून देखील म्हणावा तसा दर मिळत नसल्याने आणि गाईसाठी होणाऱ्या चारा, पाणी, पशुखाद्य याचा सारासार विचार करता सध्याचा दूध दर उत्पादकांना परवडणारा नाही. तसेच गायीच्या वाढलेल्या भरमसाठ किमती या सर्वाचा ताळमेळ जुळणे कठीण असल्याने शासनाने गाईच्या दुधाचा दर वाढवून द्यावा आणि गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी या भागातील तमाम शेतकरी, दूध उत्पादकांतून करण्यात येत आहे.
गायीच्या दुधाचा दर कमी असल्याने परवणे मुश्कील
म्हशीपेक्षा गाय दूध अधिक देते. सध्या आम्ही जर्सी गाईवर अधिक भर दिलेला असल्याने या गाईचा खर्चही अधिक असतो. त्याप्रमाणे गाय दूधही जादा देते. मात्र गाईच्या दुधाला दर अत्यल्प असल्याने आलेले उत्पन्न गाईंच्या देखभाल करण्यासाठीच खर्च होते. त्यामानाने दूध उत्पादकाला म्हणावा तसा फायदा होत नाही. यासाठी गाईच्या दुधाला दर अधिक मिळणे गरजेचे आहे.
– तुकाराम डोणकरी, उचगाव
गायीच्या दूध दरामुळे बऱ्याच वेळा तोटाच
म्हैस दूध कमी प्रमाणात देते. मात्र फॅटनुसार दर अधिक मिळतो.पण दुग्ध व्यवसाय करत असताना म्हैस दूध देण्याचे प्रमाण मात्र कमी असते. त्यामानाने गाय दूध अधिक देते पण दर कमी असतो. यामुळे आम्ही जास्त करून गाईच बाळगत असल्याने या गाईच्या दुधातून फायदा होत नाही. अनेक वेळा तोटाच सहन करावा लागतो. कारण गाईच्या दुधाला दर फारच कमी आहे. यासाठी शासनाने गायीच्या दुधाला दर वाढवून देणे अत्यंत गरजेचे आहे.
– रघुनाथ खांडेकर, तुरमुरी











