अन्यथा आंदोलनाचा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा इशारा
बेळगाव : एफआरएस रद्द करून आयसीडीएस योजना पूर्वीप्रमाणे कायम ठेवावी. तसेच न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वर्ग सी व डी गटातील कर्मचारी म्हणून त्यांचे वर्गीकरण करावे. 2018 पासून लागू केलेल्या वेतनात वाढ करावी. अन्यथा हाताला काळ्यापट्या बांधून आंदोलनाचा इशारा देत नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये संबंधित केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन बालविकास योजनाधिकाऱ्यांना देण्यात आले. अंगणवाडी सेविकांना मिळत असलेल्या सुविधा आधार कार्ड नसल्याचे कारण सांगून दिल्या जात नाहीत. यामुळे सेविकांना सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. एफआरएस अनिवार्य करून हक्कांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न शासनांकडून करण्यात येत आहे. यामुळे सेविकांवर अन्याय होत आहे. देशातील आयसीडीएस लाभार्थ्यांची संख्या कमी दाखवून निधी कमी करण्याचा घाट घालण्यात येत आहे. यामुळे एफआरएस रद्द करून पूर्वीप्रमाणेच आयसीडीएस लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.









