वाहतूक कोंडी नित्याचीच बाब : दुतर्फा पार्किंगचा परिणाम
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केले जात असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरात वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या पोलिसांकडून या भागातील वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनधारकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्याचे रुंदीकरण करून वाहन पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे. सध्या वाहन पार्किंगच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्याने शासकीय कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाहने लावण्यास जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून कचेरी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा पार्किंग केले जात आहे. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहनधारकांना शिस्त नसल्याने जागा मिळेल तेथे वाहने लावली जात आहेत. यामुळे सदर रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचेरी रोडहून कोर्ट आवाराकडे जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून या भागात वाहन पार्किंगला शिस्त लावण्यात यावी. यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.









