हन्नीकेरे येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव बाहेरील जय किसान भाजीमार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर मार्केट सुरू झाल्यापासून बेळगावच्या आसपासच्या गावांमध्ये भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मात्र सध्या जय किसान भाजीमार्केट बंद करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. सदर मार्केट बंद झाल्यास भाजीपाला उत्पादकांवर अन्याय होणार असून त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. यामुळे सदर भाजीमार्केट सुरू ठेवण्याची मागणी हन्नीकेरे येथील शेतकऱ्यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जय किसान भाजीमार्केट बंद झाला तर शेतकऱ्यांना अपरिहार्यपणे एपीएमसीमध्ये जावे लागेल. यामुळे त्यांचा वाहतूक खर्च दुप्पट होणार असून एपीएमसी व्यापारी 8 ते 15 टक्क्यापर्यंत कमिशन आकारतील. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. काहीजण स्वार्थ भावनेने भाजीपाला मार्केट बंद पाडण्याचा घाट घातला आहे. सदर विरोध करणाऱ्यांपैकी कोणीही शेतकरी नाहीत.हे सर्वजण एपीएमसी व व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत.
एपीएमसीमधील काही दुकानदार रियल इस्टेट व्यवसायात असून व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या नावांवर दोन ते तीन दुकाने आहेत. ते भाड्याने देऊन महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचे भाडे आकारतात. हे जरी एपीएमसी कायद्याविरोधात असले तरी अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. यासाठी जय किसान भाजीमार्केट हे आसपासच्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून ते बंद न करता पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणीही करण्यात आली.









