रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज : लहान मोठ्या अपघाताची मालिका सुरूच
बेळगाव : बेनकनहळ्ळी सावगाव दरम्यानचा मुख्य संपर्क रस्ता अरुंद असल्याने वाहनाना ये-जा करताना धोका पत्करावा लागत आहे. तसेच या मार्गावर असलेला केंबाळी नाल्याची रुंदी अत्यंत कमी असल्याने नाल्यात वाहने पडण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ आणि वाहनचालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. बेनकनहळ्ळी आणि सावगाव दरम्यानच्या संपर्क रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मंडोळी, हंगरगे, खादरवाडी, भवानी नगर, उद्यमबाग आदी ठिकाणी जाणारे नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. तर बेनकहळ्ळी मार्गे बेळगावला जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता आहे. या दोन्ही गावच्या मधोमध अनेक शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये झाली असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
रस्ता रुंदीकरणाची मागणी
अनेक वर्षापासून हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढविण्यात यावी, अशी मागणी केली जात असली तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्य म्हणजे या मार्गावर असलेला केंबाळी नाला एकदमच अरुंद आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहने आल्यास त्या ठिकाणी वाहने नाल्यात कलंडत आहेत. नाल्याखाली सिमेंटच्या पाईप घालण्यात आल्या आहेत. त्याभोवती संरक्षण कठडेदेखील बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून ये-जा करण्याची वेळ आली आहे. सदर रस्त्याची रुंदी वाढवून नाल्याच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे पूल बांधण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.
रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी
गतवर्षी सदर नाल्यात एक कार पलटी झाली होती. केवळ सुदैवानीच त्यावेळी मोठी दुर्घटना टळली होती. ही माहिती समजल्यानंतर महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे रस्त्याच्या रुंदीकरणासह केंबाळी नाल्याच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली होती. रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहने पास होताना रस्त्याच्या कडेला गेल्यास चिखलात रुतून पडत आहेत. शहरापासून जवळच असलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष घालून समस्या मार्गी लावावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
केंबाळी नाल्यासह रस्त्याचे रुंदीकरण करा
बेनकनहळ्ळी सावगाव दरम्यानचा रस्ता अत्यंत अरूंद आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते. त्याचबरोबर केंबाळी नालादेखील धोकादायक असल्याने त्या ठिकाणी पूल उभारुन संरक्षण कठडा बांधणे गरजेचे आहे. गतवर्षी एक कार गाडी नाल्यात पडली होती. केवळ सुदैवानेच त्यावेळी कोणतीच जीवितहानी झाली नाही. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यासह नाल्याचे काम हाती घेण्याची गरज आहे.
निंगाप्पा मोरे, माजी ग्रा. पं. अध्यक्ष बेनकनहळ्ळी.









