बेळगाव : बेळगाव-गोकाक रोडवरील कणबर्गी गावानजीक नाल्याच्या ठिकाणी काँक्रिटची भिंत घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून सदर काम अर्धवट स्थितीत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. अर्धवट कामाच्या ठिकाणी रस्ता निमूळता झाल्याने रात्रीच्यावेळी रस्त्याचा अंदाज येणे अवघड झाले आहे. लोखंडी सळीदेखील तशाच सोडून दिल्या आहेत. पावसामुळे दोन्ही बाजूचा रस्ता खचत चालला असून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कणबर्गीनजीक असलेल्या नाल्याच्या ठिकाणी काँक्रिटची भिंत उभारण्याचे काम सुरू केले होते. काही काम केल्यानंतर ठेकेदाराने त्याठिकाणचे काम अर्धवट सोडून दिले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने सदर काम हाती घेण्यात आले होते.
बेळगाव-गोकाक रोडवर वाहनांची दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. लहान वाहनासह अवजड वाहने देखील सातत्याने ये-जा करतात. मात्र नाल्याच्या ठिकाणी रस्ता निमूळता झाला आहे. त्यामुळे या मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येणे कठीण जात आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रस्त्याच्या कडेला बॅरेल ठेवले आहेत. मात्र काँक्रिटचे काम पूर्ण न झाल्याने त्याठिकाणी रस्ता खचत चालला आहे. एखादे अवजड वाहन आल्यास विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना थांबावे लागत आहे. रस्त्यापासून नाल्यापर्यंत मोठे अंतर असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यापूर्वी अर्धवट स्थितीतील काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. अर्धवट स्थितीतील कामाच्या ठिकाणी वळण असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत.









