देवस्थान पंच कमिटी-ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतीला दिले निवेदन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 2026 मध्ये भरविण्याचे नियोजन ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. यात्रेपूर्वी गावामधील अपूर्ण विकासकामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा असे निवेदन देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांतर्फे गुरूवारी पीडीओ गोविंद रंगापगोळसह ग्रा. पं. सदस्यांना देण्यात आले. गावची लक्ष्मी देवीची यात्रा सन 1983 साली भरविण्यात आली होती. आज यात्रा भरवून 41 वर्षे झाली आहेत. आता 2026 मध्ये यात्रा भरविण्याचा निर्णय ग्रामस्थ व देवस्की पंच कमिटीतर्फे घेण्यात आला आहे. गावामध्ये अनेक विकासकामे अर्धवट आहेत. यामध्ये कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर मुख्य रस्ता, गावातील व उपनगरातील रस्ते, गटारी पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेली घरोघरी 24 तास पाणीपुरवठा जलजीवन योजना अजून अपूर्णच आहे. सदर योजनाही पूर्णत्वास आणून नागरिकांना घरोघरी 24 तास पिण्याचे पाणी पुरविणे गरजेचे आहे. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी यात्रेची तारीख निश्चित करणे अनुकूल ठरणार आहे. तेव्हा ग्रा. पं. ने विकासकामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा देऊन यात्रा करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील, उपाध्यक्ष मल्लाप्पा पाटील, सदस्य यल्लाप्पा पाटील, शंकर पाटील, मारुती पाटील, महादेव पाटीलसह इतर पंच व ग्रामस्थ उपस्थित होते.









