वार्ताहर/धामणे
राजहंसगड ता. बेळगाव येथील शेतात स्वयंभू गणपतीची चार फुट उंच आणि सहा फूट घेरी असलेली साक्षात गणपतीचा आकार मूर्तीला असल्यामुळे भटजीकडे याबद्दल चौकशी केली असता भटजीने ती स्वयंभू गणपतीची मूर्ती असल्याचे सांगितले. परंतु या मूर्तीसाठी 9 वर्षे पूजा करा. नंतर मंदिर बांधा, असेही भटजीने सांगितल्याचे कळते. बेळगाव महाद्वार रोड येथील शांताराम गाडे यांनी राजहंसगड गावापासून थोड्याच अंतरावर 2010 साली घेतलेल्या शेतात कसण्यासाठी कामाला सुरुवात केली असताना ही गणपतीची मूर्ती सापडली आहे. तेंव्हापासून या स्वयंभू गणपतीची पूजा सुरू असून 2017 साली पत्र्याचे मंदिर उभे केले. आता या गणपतीच्या दर्शनासाठी राजहंसगड आणि शेजारील गावातील भाविक येत आहेत. प्रत्येकवर्षी गणेश जयंतीला गाडे कुटुंबीयांच्यावतीने मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रत्येक संकष्टीलाही भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु या गणपतीच्या दर्शनासाठी रस्ता लहान असल्याने भाविकांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. देसूर, राजहंसगड गावच्या मेन रोडपासून थोड्याच अंतरावर हे स्वयंभू गणपतीचे मंदिर असल्यामुळे राजहंसगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी या स्वयंभू गणपतीचे दर्शन होणार आहे. परंतु रस्त्याअभावी पावसाळ्यात भाविकांना दर्शनासाठी मुकावे लागत आहे. राजहंसगड हे गाव सुळगा (ये.) ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे ग्राम पंचायतीने पुढाकार घेवून या गणपती मंदिरला जाणेसाठी रस्ता उपलब्ध करावा, अशी मागणी येथे येणाऱ्या भाविकांकडून होत आहे.









