बेळगाव : आजकाल सर्रासपणे परिवहन मंडळाचे चालक व वाहक बसमधून मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले आहे. जर फोनवर बोलत असताना अचानकपणे गंभीर धोका होण्याची शक्यता असते. मात्र परिवहन मंडळही याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एक बस महामार्गावरून बेळगावहून जोतिबा मार्गाकडे जात होती. त्यावेळी बसचालक फोनवर बोलत असल्याचे आढळून आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी चालकाला विचारले असता चालकाने हुज्जत घातल्याची घटना शुक्रवारी घडली. यामुळे चालकांवर बस चालवताना बंदी आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
परिवहन मंडळाने ताकीद द्यावी
बसचालक व वाहकाच्या विश्वासावर लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत अनेक प्रवासी बसमधून प्रवास करतात. जर महामार्गाचे काम सुरू असताना आणि वाहनांची वर्दळ असताना चालक बस चालवताना फोनवर बोलणे अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत चालकांना विचारले असता किंवा बस कडेला थांबवून फोनवर बोलण्यास सांगितल्यास चालक वादविवाद करतात. यासाठी धोक्याचा इशारा ओळखून व याबाबत मूग गिळून गप्प बसलेल्या परिवहन मंडळाने वेळीच चालकांवर बस चालवताना बंदी आणून त्यांना सक्त ताकीद देण्याची गरज आहे.









