वृत्तसंस्था /काठमांडू
नेपाळने भारताकडून तांदळाच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये सणासुदीचा काळ सुरू होणार असल्याने खाद्यसामग्रीच्या टंचाईपासून वाचण्यासाठी नेपाळने ही मागणी केली आहे. नेपाळने भारताला तांदूळ, साखर अन् इतर धान्यं पुरविण्याचे आवाहन केले आहे. नेपाळने भारताकडे 10 लाख टन गहू, एक लाख टन तांदूळ आणि 50 हजार टन साखर उपलब्ध करविण्याची मागणी केली आहे. भारताने अलिकडेच देशांतर्गत किमती नियंत्रित ठेवण्यासाठी बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारताच्या या निर्णयानंतर नेपाळमधील व्यापाऱ्यांनी साठेबाजी सुरू केली होती. यामुळे तेथे बिगरबासमती तांदळाच्या किमती वाढल्या होत्या. नेपाळ तांदळाच्या बदल्यात भारताला टोमॅटोचा पुरवठा करत आहे. भारतात टोमॅटोचे दर वाढल्याने नेपाळने मदतीचा हात पुढे केला आहे. नेपाळच्या बाजारपेठांमध्ये सध्या तांदूळ अन् साखरेची टंचाई नाही. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान सणासुदीच्या काळात तांदूळ आणि साखरेची मागणी वाढते. याचा थेट प्रभाव किमतींवर पडतो. सर्वसामान्य लोकांना भविष्यात कुठल्याही प्रकारच्या टंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून सरकार पूर्वतयारी करू इच्छित असल्याचे नेपाळच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 20 जुलै रोजी भारताने देशांतर्गत पुरवठा वाढविण्यासाठी सणासुदीच्या काळात किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. नेपाळ हा भारताकडून पुरविल्या जाणाऱ्या तांदळाच्या साठ्यावर बऱ्याचअंशी निर्भर आहे.









