कोल्हापूर :
अनैतिक संबंधाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची भीती घालून व्यावसायीकाकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पाचजणांच्या टोळीवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद तारदाळ येथील सायझर्स व्यावसायीक आनंद श्रीनिवास मर्दा (वय 47, रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी सोमवारी रात्री दिली.
यानुसार स्नेहा संजय नारकर (वय 35, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) शांताबाई वाळकुंडे (रा. यशवंतनगर, इचलकरंजी), संतोष पाटील (रा. चिपरी, ता. शिरोळ), शेखर गाडेकर (रा. जयसिंगपूर) आणि रामचंद्र (नारकर हिच्या कारवरील चालक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आनंद मर्दा यांची तारदाळ येथे सायझर्स कंपनी आहे. त्यांची प्रवासामध्ये स्नेहा नारकर हिच्यासोबत ओळख झाली होती. नारकर हिने ओळख वाढवून आपण कोल्हापुरातील एका बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर काम करीत असल्याचे सांगितले. व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांकडे तारण असलेले सोने लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिने संपर्क वाढवला. त्यानंतर काही दिवसांत तिने मर्दा यांच्याकडे 3 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून त्रास देण्याची धमकी तिने दिली.
- लक्ष्मीपुरीत 43 लाखांच्या फसवणूकीचा गुन्हा
नारकर हिच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 43 लाख रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी तिला अटक केली आहे. सध्या नारकर पोलीस कोठडीत आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांचा तपास पुर्ण झाल्यानंतर नारकर हिचा ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली.








