बाजारात आवक कमी : तुलनेत दरात काहीशी वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
मकरसंक्रांत भोगीसाठी भाजीची मागणी वाढली आहे. विशेषत: सोले, वांगी, लालभाजी, कांदापात, हिरवा वाटाणा आदींना मागणी वाढत आहे. त्यामुळे या भाज्यांचे दर काहीसे वाढले आहेत. मागील आठवड्यात 40 रु. किलो असणारी वांगी 80 रु. किलो झाली आहेत. त्यामुळे मकरसंक्रांत साजरी करणाऱ्यांना वाढीव दराचा चटका सहन करावा लागत आहे.
मकरसंक्रांत दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे तिळगूळ आणि इतर पदार्थांची रेलचेल सुरू झाली आहे. त्याबरोबरच शनिवारी भोगी असल्याने भाजी, तिळगूळ आणि हिरव्या वाटाण्याला मागणी वाढत आहे. किरकोळ बाजारात सोले 100 रु. शेर, वांगी 80 रु. किलो, लालभाजी 10 रुपयांना एक पेंडी, लहान हिरवा वाटाणा 200 रु. किलो असा दर आहे. भोगीदिवशी पाच भाज्या केल्या जातात. त्यामुळे सोले, वांगी, लालभाजी, कांदापात आणि हिरव्या वाटाण्याची खरेदी वाढली आहे. विशेषत: सोले, वांगी आणि लालभाजीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत.
याबरोबरच भोगीसाठी शेंगदाणा, काळे तीळ, खोबऱ्याची चटणी, तीळ भाकरी यांना मागणी अधिक आहे. शिवाय बाजारात तयार तीळ भाकरी आणि विविध चटण्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेषत: गृहिणींकडून या चटण्यांना पसंती दिली जात आहे.









