शांतता प्रस्ताव संशयास्पद : इस्रायलकडून आरोप
वृत्तसंस्था / तेल अवीव
कोणत्याही शांतता प्रस्तावाला मान्यता मिळण्यापूर्वी हमासच्या ताब्यात असलेल्या सर्व अपहृतांची सुटका होणे आवश्यक आहे, अशी अट इस्रायलने ठेवली आहे. या संदर्भात सादर करण्यात आलेल्या नव्या शांतता प्रस्तावावर इस्रायलने संशय व्यक्त केला असून सर्व अपहृतांची सुटका झाल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका घोषित केली आहे. हमासने प्रस्ताव मान्य केला आहे.
कतार आणि इजिप्त या देशांनी हा नवा शांतता प्रस्ताव तयार केला आहे. हे दोन देश मध्यस्थ म्हणून काम करीत आहेत. त्यांचा प्रस्ताव हमासने मान्य केला असला तरी इस्रायलची मान्यता मिळेपर्यंत तो निरर्थक ठरणार आहे. अमेरिकेने यापूर्वी एक प्रस्ताव ठेवला होता. तो इस्रायलने मान्य केला होता. नवा प्रस्ताव जवळपास अमेरिकेच्या प्रस्तावासारखाच आहे, असे या दोन देशांचे म्हणणे आहे.
अंशत: करार नको
ईजिप्त आणि कतार या देशांनी दिलेला प्रस्ताव इस्रायलने स्पष्टपणे नाकारलेला नाही. मात्र, आमचा अंशत: किंवा अर्धवट करारांवर विश्वास नाही. नव्या प्रस्तावात अपहृतांच्या सुटकेसंबंधी स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे नंतर हमासकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. ही शक्यता टाळायची असेल तर सर्व अपहृतांची सुटका करावीच लागणार आहे, अशी भूमिका इस्रायलने घोषित केली आहे.
शांतता प्रक्रिया रखडणार
नवा शांतता प्रस्ताव मान्य न झाल्यास मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रिया रखडणार आहे. सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध होत आहे. गाझा पट्टीत त्यामुळे अशांतता आहे. तसेच अन्नपाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हमासने अद्यापही इस्रायलच्या अनेक अपहृतांची सुटका केलेली नाही. या अपहृतांची स्थिती दयनीय आहे. त्यांना अन्नपाणी पुरेसे न दिल्याने त्यांच्यापैकी अनेकांची प्रकृती ढासळली आहे. काही अपहृतांचा मृत्यू झालेला आहे. हमासनेच काही अपहृतांचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. या व्हिडीओंमधून अपहृतांची हालाखीची अवस्था स्पष्ट होत आहे. त्यामुळे हमासने युरोपियन देशांची सहानुभूतीही गमावल्याचे दिसत आहे. अपहृतांचा छळ करण्याच्या हमासच्या कृतीमुळे इस्रायल कोणत्याही अस्पष्ट शांतता करारावर स्वाक्षरी करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात स्थिती सुधारण्याची कोणतीही शक्यता दृष्टीपथात नाही, असे मत अनेक विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.









