एका वर्षात 50 टक्के एसयूव्ही गाड्या विकल्याची झाली नोंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या वर्षी देशात विकल्या गेलेल्या एकूण प्रवासी वाहनांपैकी 50 टक्के स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) विभागातील आहेत. अहवालानुसार, आर्थिक वर्ष-23 मध्ये प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत घाऊक विक्रीत 26.7 टक्के वाढ झाली आहे.
या कालावधीत 38,90,114 युनिट्स विकल्या गेल्या, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 22मध्ये 30,69,523 युनिट्स विकल्या गेल्या, अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ने गुरुवारी मार्च महिन्याचा विक्री अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये दिली आहे.
आर्थिक वर्ष 23 मध्ये महागाई उच्च पातळीवर राहूनही, उत्तम चिप पुरवठा, उत्पन्नक्षमतेत झालेली वाढ आणि मागणी यामुळे भारतीय वाहन निर्मात्यांना विशेषत: एसयूव्हीच्या विक्रीत मदत झाली. मार्चमध्ये महिनादरमहिना विक्री 4.7 टक्क्यांनी वाढली आहे.
याशिवाय, मार्च 2023 मध्ये प्रवासी वाहनांची देशांतर्गत घाऊक विक्री मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 4.7टक्क्यांनी वाढून 2,92,030 युनिट झाली. मार्च 2022 मध्ये, प्रवासी वाहनांची घाऊक विक्री 2,79,525 युनिट्स होती. एप्रिलच्या सुरुवातीला, फाडाने सांगितले की, भारतातील प्रवासी वाहन सेगमेंट वर्ष-दर-वर्ष 14 टक्क्यांनी वाढले आहे, कारण सर्व श्रेणींमध्ये दुहेरी अंकी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकींच्या विक्रीत 16.9 टक्के वाढ
देशांतर्गत बाजारात मार्च-2023 मध्ये दुचाकींची विक्री 12,90,553 युनिट्स होती, तर वर्षभरापूर्वी याच महिन्यात 11,98,825 युनिट्सची विक्री झाली होती. सियामने सांगितले की 2022-23 या आर्थिक वर्षात दुचाकींच्या विक्रीत 16.9 टक्के वाढ झाल्याची माहिती दिली आहे.









