म. ए. समिती कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाचा खटला जलदगतीने चालावा, या मागणीसाठी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान उच्चाधिकार समितीच्या बैठकीबाबत चर्चा करण्यात आली. सीमाप्रश्नाचा खटला पुढे ढकलला जात आहे. यामध्ये शरद पवार यांनी लक्ष घालून सर्व ज्येष्ठ वकिलांची बैठक घ्यावी. तसेच उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासमोर केली. आपण मुख्यमंत्र्यांना उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सूरज कणबरकर, संजय वेलिंगकर, अतुल बोरकर, गिरीश विचारे यांसह इतर उपस्थित होते.









