सीआयटीयूतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन, वक्तव्याचा निषेध
बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्याबरोबर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघातर्फे निषेध नोंदवून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनाचा महसूल खात्याचे अधिकारी एस. एम. परगी यांनी स्वीकार केला.
गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशन बनली असून त्यांचे नाव घेण्याऐवजी देवाचे नाव घेतल्यास स्वर्ग मिळेल, असे वक्तव्य केल्याने अमित शहा यांचा निषेध केला जात आहे. या वक्तव्याविरोधात कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्याबरोबर विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी देखील महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत अपशब्द काढले आहेत. या वक्तव्याचाही अंगणवाडी नोकर संघातर्फे निषेध करून रवी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
रवी यांच्या वक्तव्याने सर्वच महिलांचा अपमान झाला आहे. हेब्बाळकर यांच्याबद्दल काढलेले अपशब्द हे सर्व महिलांसाठी निंदनीय आहे. या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व महिलांची रवी यांनी माफी मागावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्या सीआयटीयू कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी सीआयटीयूच्या मंदा नेवगी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिवलिला मिसाळे, व्ही. सी. चव्हाण, जे. जे. हंगिरगेकर यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.









