चापगाव येथील शिवस्वराज्य संघटनेच्यावतीने वनखात्याला निवेदन
खानापूर : तालुक्यातील चापगाव येथे गेल्या आठ दिवसापासून अस्वलाचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. तसेच पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतातील कामे अपुरी राहिली आहेत. चापगाव परिसरातील अस्वलाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन शिवस्वराज्य संघटनेच्यावतीने वनखात्याला मंगळवारी देण्यात आले आहे. यावेळी शिवस्वराज्य संघटनेचे अॅड. अभिजीत सरदेसाई, रमेश धबाले, सूर्याजी पाटील, कल्लाप्पा कोडचवाडकर, प्रभू कदम यासह इतर कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. चापगाव येथे गेल्या आठ-दहा दिवसापासून पिल्लासह अस्वलाचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. शेतातील कामे अर्धवट स्थितीत राहिली आहेत. शेतकऱ्यांनी कष्ट करून आणि पैसा खर्च करून शेतीत पेरणी केली आहे. मात्र पेरणीनंतरच्या मशागतीची कामे अस्वलाच्या भीतीमुळे खोळंबली आहेत. त्यामुळे चापगावसह वड्डेबैल, शिवोली, अल्लेहोळ यासह आसपासच्या परिसरात शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनखात्याने तातडीने अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन वनखात्याला देण्यात आले आहे.









