हलशी : खानापूर ते ताळगुप्पा महामार्गावरील नंदगड ते झुंजवाडपर्यंत रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी मुरूम (तांबडी) खडी टाकण्यात आली आहे. पावसामुळे या मुरूम मातीत मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून रस्त्यावरुन वाहतूक करताना वाहने बाजूला घेतल्यास दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने या मुरूम चिखलाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बेकवाड, बिडी भागातील ग्रामस्थांतून होत आहे.
या रस्त्यावरुन नंदगड, बिडी, बेकवाड भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच कसबा नंदगड, पोलीस स्टेशन, आनंदगड विद्यालय व बाजारपेठ नंदगड, कॉलेज इत्यादी स्थानावर जाण्यासाठी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. समोरुन येणाऱ्या वाहनामुळे दुचाकी अथवा चारचाकी बाजूला घेतल्यास चिखलातून वाहन सरकत जावून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या चिखलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे.









