चेन्नई / वृत्तसंस्था
सध्या आयपीएलची स्पर्धा रंगात आली आहे. सारा देश या स्पर्धेचा आनंद घेत आहे. अशा परिस्थितीत या स्पर्धेतही आरक्षण निर्धारित केले जावे, अशी मागणी होऊ लागली आहे. अर्थात, ही मागणी जातीच्या आधारावर नसून ती भाषेच्या आधारावरील आरक्षणाची आहे. तामिळनाडूतील पट्टली मक्कल काची (पीएमके) या पक्षाचे संसद सदस्य अन्बुमणी रामदास यांनी ती मंगळवारी केली.
आयपीएल स्पर्धेतील सीएसके हा संघ चेन्नई शहराचा आहे. तथापि, या संघात एकही ‘तामिळ’ भाषिक खेळाडू नाही, यावर रामदास यांचा आक्षेप आहे. तामिळनाडूत असा कायदा असला पाहिजे, की ज्यामुळे तामिळनाडूतील कोणत्याही क्षेत्रात 80 टक्के जागा तामिळ नागरीकांनाच दिल्या गेल्या पाहिजेत. हा नियम आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱया संघांनाही लागू केला पाहिजे, अशी मागणी रामदास यांनी रविवारी मिडियाशी बोलताना केली.
धोनी आपल्या आवडीचा
मी स्वतः सीएसकेचा समर्थक आहे. मला धोनीचा खेळ अतिशय आवडतो. तो फटके मारतो तेव्हा आपण आनंदाने नाचतो. शिटय़ा वाजवतो. पण त्याचवेळी सीएसकेच्या 20 खेळाडूंमध्ये एकही तामिळ नाही, ही बाब मला सलते. किमान एकतरी खेळाडू तामिळ हवा होता. चेन्नई या नावावर निर्माण झालेल्या संघात तामिळनाडूचा एकही खेळाडू नसावा, ही बाब औचित्यपूर्ण नाही. असे घडायला नको होते, असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
तंबाखूला विरोध
आयपीएलच्या जाहिरातींमधून तंबाखूशी संबंधित सर्व प्रतिबंधित वस्तूंच्या जाहीरातींना फाटा देण्याचा नियम करावा, असे पत्र आपण तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पाठविले आहे. त्यांनी यासंबंधी पुढाकार घ्यावा आणि या बंदीचे पालन सक्तीने करुन घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तंबाखू आणि त्याच्यापासून बनणारी उत्पादने मानवी आरोग्याला धोकादायक असून त्यांची जाहीरात करणे तितकेच धोकादायक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थिती नेमकी काय आहे ?
रामदास यांच्या म्हणण्यानुसार सीएसके संघात एकही तामिळ खेळाडू नाही, ही बाब सत्य आहे. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत एकंदर 12 तामिळ खेळाडू खेळत आहेत. तथापि, त्यांना सीएसके सोडून अन्य संघांनी खरेदी केले आहे. या स्पर्धेची संघ रचना ही कोणत्याही राज्याशी संबंधित नसून केवळ महत्वाच्या शहरांच्या नावाने संघ बनविण्यात आले आहेत. या संघांमधून विदेशी खेळाडूही खेळतात. या स्पर्धेचे स्वरुपच असे आहे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुठल्याही भाषेचा संबंध याच्याशी जोडला जाऊ नये. हा खेळाचा प्रश्न असून त्याच्याकडे याच दृष्टीने पाहिले जावे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









