ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष – सदस्यांचे ता. पं. अधिकाऱयांना निवेदन
खानापूर : जांबोटी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी नागाप्पा बन्नी यांची बदली करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी बुधवारी तालुका पंचायत अधिकारी यांना भेटून दिले. बन्नी यांची बदली 20 जूनपर्यंत न झाल्यास तालुका पंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी सदस्यांनी दिला.
जांबोटी ग्रा. पं. विकास अधिकारी श्रीदेवी अंगडी यांची अथणी येथे बदली झाल्याने त्या जागी मे महिन्यात नागाप्पा बन्नी यांची विकास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळी जांबोटी ग्रा. पं. च्या सर्व सदस्यांनी बन्नी यांची जांबोटी ग्रा. पं. वर नेमणूक करण्यात येऊ नये, म्हणून निवेदन दिले होते. मात्र, निवेदनाची दखल न घेता बन्नी यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर ग्रा. पं. सदस्यांनी त्यांच्या बदलीच्या मागणीचे निवेदन ता. पं. अधिकाऱयांना दिले होते. मात्र, त्याचीही दखल अद्याप घेण्यात आली नाही. त्यासाठी बुधवारी जांबोटी ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्षा मयूरी सुतार, सदस्य सुनील देसाई, सूर्यकांत साबळे, प्रविणा साबळे, अंजना हणबर, मंजुनाथ मुतगी, अशोक सुतार, लक्ष्मी मादार, लक्ष्मी तळवार, अनुराधा सडेकर यांनी ता. पं. अधिकाऱयांना बन्नी यांच्या बदलीचे निवेदन दिले. बन्नी यांची त्वरित बदली करण्याची मागणी
यावेळी केली.
यावेळी अध्यक्ष महेश गुरव म्हणाले, बन्नी यांनी कडतन बागेवाडी, बेकवाड, नेरसा, गोधोळी, चापगाव या पंचायतीत काम केले आहे. मात्र, तेथे वादग्रस्त व भ्रष्टाचारी अधिकारी म्हणून त्यांच्याविरोधात अनेक वेळा आंदोलने झाली आहेत. त्यासाठी जांबोटी ग्रा. पं. मध्ये त्यांना रुजू करून घेऊ नये म्हणून आम्ही निवेदन दिले होते. मात्र, घाईगडबडीत येऊन त्यांनी चार्ज घेतला आहे. गेल्या महिन्याभरात त्यांचा कारभार पाहता जांबोटी पंचायतीचा विकास निश्चित खुंटणार आहे. जांबोटी ग्रा. पं. विकासाच्या बाबतीत सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. शासनाकडून मिळणाऱया निधीतून ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील विकास हेच आमचे ध्येय असल्याने येथे विकास अधिकारी चांगला हवा आहे. यासाठी जांबोटी ग्रा. पं. च्या सर्व सदस्यांनी त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बन्नी यांची बदली झाली नाही तर कोणत्याही आंदोलनाला आम्ही तयार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.









