27 नोव्हेंबर रोजी आंदोलनाचा इशारा
खानापूर : खानापूर तालुक्मयातील वड्डेबैल येथील मलप्रभा नदीवरील बंधाऱ्यातून गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने या भागातील 1 हजार हेक्टरवरील शेती धोक्मयात आली आहे. लघुपाटबंधारे खात्याने याची दुरुस्ती न केल्यास सोमवार दि. 27 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा चापगाव, वड्डेबैल, यडोगा, लक्केबैल येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रकाश गायकवाड यांना दिले आहे. या निवेदनाचा तहसीलदारांनी स्वीकार करून लघुपाटबंधारे खात्याला तातडीने क्रम घेण्याचे आदेश दिले आहेत. वड्डेबैल येथील मलप्रभा नदीवर गेल्या काही वर्षांपूर्वी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र बंधारा बांधत असताना बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले होते. त्यामुळे पाणी अडवल्यानंतर या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात गळती होऊन अडवलेले पाणी वाहून जाऊन बंधारा ओस पडत आहे. यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेली 1 हजार हेक्टर शेतीतील पीक धोक्यात आले आहे. यासाठी हा बंधारा दुरुस्त करण्याची मागणी गेल्या वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र लघुपाटबंधारे खात्याने या मागणीकडे साफ दुर्लक्ष करून यावर्षीही पाणी अडवले आहे. मात्र गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने येत्या महिन्याभरातच या बंधाऱ्यातील पाणी संपणार आहे. त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध होणार नाही. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने या बंधाऱ्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा सोमवार दि. 27 रोजी तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी चापगाव, वड्डेबैल, लक्केबैल, यडोगा यासह या भागातील नागरिकांनी दिला आहे. या निवेदनावर ग्रा. पं. माजी अध्यक्ष रमेश धबाले, हणमंत बेळगावकर, जैनू पाटील, मारुती पाटील, जैनु पाटील, तुकाराम अंबाजी, राजू पाटील, नारायण पाटील, अशोक पाटील, बळवंत पाटील, अभिजीत पाटील यासह इतर नागरिकांच्या सह्या आहेत.