बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती. गणेशोत्सव होऊन अवघे चार ते पाच दिवस उलटले आहेत. आता रस्त्यांवर पुन्हा खड्डेच खड्डे दिसून येत असून नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांचा परिणाम शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही होत असून धुळीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. दुहेरी संकटामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.फिश मार्केटसमोरील कॅम्प रस्त्यावर खड्डे दिसून येत आहेत. परिणामी रस्ता खचल्याने वाहतूक करण्यास त्रासदायक ठरत आहे.
सदर परिसरात शाळा, महाविद्यालय असल्याने सदर रस्त्यावर सततची वर्दळ असते. खड्ड्यांमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना ये-जा करणे कठीण होत आहे. तसेच रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्कींग करण्यात येत असल्याने रस्ता अरूंद बनला आहे. याचाही परिणाम वाहतुकीवर होत आहे.रस्ता ठिकठिकाणी खचल्याने लहान मोठे दगड रस्त्यावर दिसत आहेत. तसेच धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. काही पालक आपल्या मुलांना शाळा किंवा महाविद्यालयाला सोडण्यासाठी या मार्गावरून ये-जा करत असतात. दगडांमुळे वाहने स्लीप होऊन अपघात होण्याचीही शक्यता आहे. आरोग्याचा प्रश्न व अपघात टाळण्यासाठी महापालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.









