परिवहनला निवेदन : अनियमित बससेवेचा विद्यार्थ्यांना फटका
बेळगाव : बसरीकट्टी गावची बससेवा अनियमित झाल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी आणि महिलांची गैरसोय होऊ लागली आहे. सकाळची बसफेरी बंद झाल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. गावची बससेवा सुरळीत करा, अशा मागणीचे निवेदन बसरीकट्टी ग्राम पंचायतीतर्फे परिवहन मंडळाला देण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बसरीकट्टी गावाला अनियमित बससेवेचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: विद्यार्थी आणि महिला वर्गाची कुचंबना होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांकडे बसपास असून देखील खासगी वाहनाने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसू लागला आहे. शक्ती योजना सुरू असली तरी गावाला सुरळीत बस नसल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
सुरळीत बस न सोडल्यास आंदोलन
गावाला सुरळीत बसफेऱ्या न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी विकास देसाई, ग्राम पंचायत सदस्य सागर शेरेकर, तानाजी चौगुले, सुधीर हंजूर यांच्यासह इतर सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.









