ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर : कोडचवाड ग्रा. पं. कार्यक्षेत्रात येणाऱ्या देमिनकोप्प गावात रेशन वितरण व्यवस्था गावातच करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देमिनकोप्प ग्रामस्थांनी शुक्रवारी तहसीलदारांना दिले. यावेळी उपतहसीलदार संगोळ्ळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. देमिनकोप्प गावात जवळपास शंभरच्या आसपास बीपीएल रेशनकार्डधारक आहेत. या रेशन कार्डधारकांना कोडचवाड येथील रेशन दुकानात रेशन देण्यात येते. त्यामुळे देमिनकोप्प ग्रामस्थांना तीन कि. मी. चा प्रवास करावा लागतो. मात्र रेशन वितरणच्यावेळी सर्व्हर उपलब्ध नसल्याने अनेकवेळा वेळेला रेशन न घेताच परत यावे लागते. त्यामुळे रेशन मिळवण्यासाठी देमिनकोप्प ग्रामस्थांची ससेहोलपट होते. यासाठी देमिनकोप्प गावातच रेशन वितरण व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. निवेदन देताना सनातन पाटील, हणमंत पाटील, अर्जुन बा. पाटील, अशोक पाटील, आण्णाप्पा पाटील, सुरेश पाटील, रामनिंग कल्लाप्पा पाटीलयासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









