शाळेला टाळे ठोकून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा एसडीएमसीचा इशारा
खानापूर : तालुक्यातील पश्चिम भागाचे शेवटचे टोक असलेल्या चोर्ला गावात गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरुपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेली चार वर्षे अतिथी शिक्षकांवर शाळा सुरू असल्याने पालक गोवा राज्यातील सूरल येथे आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत असल्याने मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यासाठी तातडीने कायमस्वरुपी शिक्षकाची नेमणूक करावी, अन्यथा शाळेला टाळे ठोकून गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा एसडीएमसी कमिटीने गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील व्यवस्थापकांना दिला आहे. चोर्ला येथील मराठी शाळेचा इतिहास शेकडो वर्षांचा असून ही शाळा 1856 साली सुरू झाल्याची नोंद आहे. या शाळेतून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शाळेत गेली चार वर्षे कायमस्वरुपी शिक्षकच देण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चोर्ला मराठी शाळेत सध्या 20 विद्यार्थी शिक्षण घेत असून ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे. पूर्वी या शाळेत 120 पेक्षा जास्त पटसंख्या होती. मात्र, वेळोवेळी शिक्षकांच्या कमतरतेमुळे आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक गोवा राज्यातील सुरल येथे शिक्षणासाठी पाठवत आहेत. त्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कायमस्वरुपी शिक्षकाची मागणी अनेकवेळा करूनही शिक्षण खात्याने चोर्ला शाळेला शिक्षक दिलेला नाही. त्यामुळे चार वर्षांपासून अतिथी शिक्षकांवरच ही शाळा चालत आहे. परिसरातील गावात डीएड पदवीधर उमेदवार नसल्याने बाहेरून अतिथी शिक्षक म्हणून सेवा बजावण्यास कोणीही तयार नसल्याने चोर्ला मराठी शाळेला अतिथी शिक्षकही वेळेवर मिळत नाही. यावर्षी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दोन अतिथी शिक्षक मंजूर केले. मात्र अद्याप कोणीही अर्ज केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांविनाच शाळा सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने कायमस्वरुपी शिक्षकाची नेमणूक करावी, तसेच अतिथी शिक्षकांचीही येत्या चार दिवसात नेमणूक करून शाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी एसडीएमसी कमिटी, गाव पंच कमिटीच्यावतीने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट देऊन व्यवस्थापकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी किरण गावडे, एसडीएमसी अध्यक्षा रेश्मा गावडे, अनंत गावडे, प्रियांका गावकर, शेवंता गवस, सहदेव गावकर, दशरथ गावकर, सुरेश गावडे, दिलीप गवस यासह अन्य ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.









