नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मिरज-मंगळूर दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्प्रेस सुरू करण्यासाठी प्रवाशांनी धडपड सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्राला कर्नाटकातील कोकण किनारपट्टीशी जोडणारी ही रेल्वे तात्काळ सुरू करावी, अशी मागणी मिरज येथील प्रवाशांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. मिरज येथील काही रेल्वे प्रवाशांनी नैर्त्रुत्य रेल्वेचे प्रवासी वाहतूक व्यवस्थापक पी. राजलिंगम बसू यांची भेट घेतली. यावेळी या प्रवाशांनी मिरज-मंगळूर रेल्वेची मागणी केली. कोकण किनारपट्टीवर वसलेल्या मंगळूर येथे अनेक नामवंत शिक्षण संस्था आहेत. बेळगाव, मिरज, रायबाग, कुडची या परिसरातील अनेक विद्यार्थी मंगळूर येथे शिक्षण घेत आहेत. त्यांना ये-जा करण्यास ही एक्प्रेस महत्त्वाची ठरू शकते. सध्या मिरज-मंगळूर या मार्गावर एकही एक्प्रेस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एर्नाकुलम ते पुणे दरम्यान धावणारी एकमेव पूर्णा एक्प्रेस ही मिरज-मंगळूर दरम्यान धावते. ही साप्ताहिक रेल्वे असूनही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महालक्ष्मी एक्प्रेस सुरू झाल्यास प्रवाशांची सोय होईल. एक्प्रेस सुरू झाल्यास घाटमाथ्यावरील जिल्हे कोकण किनारपट्टीशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेने लवकर एक्प्रेस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.









