खासदार अनंतकुमार हेगडे यांना दिले निवेदन
वार्ताहर /किणये
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गासाठी निट्टूर ते प्रभूनगर येथील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेण्यात आल्या आहेत. मात्र यातील काही शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्या जमिनीची रक्कम त्वरित मिळवून द्यावी. तसेच निट्टूरपासून ते प्रभूनगरपर्यंत सर्व्हिस रस्ता करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन बुधवारी कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना रमेश पाटील व अन्य शेतकऱ्यांनी दिले. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग निट्टूरपासून ते प्रभूनगरपर्यंत करण्यासाठी या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी प्रशासनाने रस्त्याच्या विकासासाठी घेतल्या. विकास कामाला शेतकऱ्यांनी सहकार्यही केले. मात्र विकास कामाला सहकार्य करणाऱ्या या शेतकऱ्यांनाच आपल्या जमिनीचे पैसे मिळाले नाहीत. त्यासाठी सरकारदरबारी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. रस्त्याच्या विकासासाठी जमिनी दिल्या आहेत. त्याचा मोबदला प्रशासनाने द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या राष्ट्रीय महामार्गासाठी निट्टूर व प्रभूनगर भागातील अनेक नागरिकांची राहती घरेही काढण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सध्या मात्र या ठिकाणी सर्व्हिस रस्ताही सुरळीत करण्यात आलेला नाही. यामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील स्थानिक वाहनांची वाहतूक व्हावी आणि नागरिकांना सोय व्हावी यासाठी त्वरित प्रशासनाने सर्व्हिस रस्ता करावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रमेश पाटील व अन्य शेतकऱ्यांच्या बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी प्रशासनाने घेतलेल्या आहेत. अद्यापही रक्कम देणे शिल्लक आहे. प्रशासनाचे दरवाजे अनेकवेळा ठोठावूनही आपल्याला रक्कम मिळत नाही. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे, असा सवालही रमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचवून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. तसेच सर्व्हिस रस्ता करण्यात यावा, अशी मागणी हेगडे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी सुरेश देसाई, जोतिबा रेमाणी, येळ्ळूरकर, प्रमोद कोचेरी आदींसह या भागातील शेतकरी उपस्थित होते.









