विजय सरदेसाई यांचा गंभीर आरोप : एक महिला पैसे मागत असल्याचा केला दावा
मडगाव : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील लोअर डिव्हिजन क्लार्क (थ्अ) पदांच्या भरतीप्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेली भरतीप्रक्रिया ‘नोकरीसाठी पैशांची मागणी केली जात असल्याने कलंकित’ झाल्याचा असत्यापित अहवाल प्राप्त झाल्याचा दावा सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई यांच्या म्हणण्यानुसार, एलडीसी पदांसाठी पहिली परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये घेण्यात आली होती, त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये कौशल्य चाचणी घेण्यात आली होती. मात्र, निकाल जाहीर होण्यास सात महिने लोटले असतानाही, उमेदवारांकडून रोख रकमेची मागणी करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. या नोकऱ्या सुरक्षित करण्याच्या बदल्यात ज्या नोकऱ्या पात्र लोकांना, बहुतांश गरीब पार्श्वभूमीतील लोकांना जायला हव्या होत्या, त्या भाजप सरकारने विकल्या आहेत. हा माझा सरकारवरचा आरोप आहे असे सरदेसाई म्हणाले.
सरदेसाई यांनी उघड केले की, त्यांनी या आरोपांचे निराकरण करण्यासाठी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. सरदेसाई यांना मिळालेल्या तक्रारींवरून असे दिसून येते की, उमेदवारांना एका महिलेने संपर्क साधला होता व तिने नोकरी मिळवण्यासाठी पैशांची मागणी केली होती. ‘ज्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की, त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून ते भरतीप्रक्रियेत अयशस्वी झाले. या असत्यापित दाव्यांची त्वरित चौकशी करणे आवश्यक आहे.
काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागावर (पीडब्ल्यूडी) केलेल्या अशाच आरोपाची आठवण सरदेसाई यांनी महसूलमंत्र्यांना करून दिली. ‘बाबुश मोन्सेरात यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरीसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप केला होता. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आज त्यांची पाळी आहे आणि त्यांनी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे असे सरदेसाई म्हणाले. निकाल जाहीर होण्यास झालेल्या विलक्षण विलंबावर प्रकाश टाकत सरदेसाई यांनी प्रŽ केला, ‘भरती परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सात महिने का लागतात ? ही भरती तत्काळ थांबवायला हवी, नाहीतर हे सिद्ध होईल की नोकऱ्या पात्र, तऊणांसाठी आहेत. पात्र उमेदवार विकले जात आहेत. सरदेसाई यांनी भरतीप्रक्रिया तत्काळ थांबवावी आणि कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करून न्याय मिळावा आणि पात्र उमेदवार त्यांच्या संधीपासून वंचित राहू नयेत, अशी मागणी केली आहे.
पैसे मागितल्याचा पुरावा द्या
दरम्यान,महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकरभरतीसंदर्भात एक महिला पैसे मागत असल्याचा पुरावा आमदार विजय सरदेसाई यांनी द्यावा असे म्हटले आहे. मी आजपर्यंत कधीच नोकऱ्यांच्या बाबतीत लुडबूड केलेली नाही. मीही याआधी नोकऱ्यांसाठी पैशांच्या देवाण घेवाणीचा आरोप केला होता. पण, तो पुराव्यासह असे मंत्री मोन्सेरात म्हणाले.









