मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्रावर साधला निशाणा : हिंदी स्वीकारण्यास नकार
वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडूत तीन भाषा धोरणावरून सुरू असलेल्या वादादरम्यान मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाषिक समानतेची मागणी करणे म्हणजे अंधराष्ट्रवाद नाही. खरे अंधराष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी हिंदीसाठीचे कट्टरवादी आहेत. हिंदीबद्दल कट्टरवादी असलेले लोक स्वत:चा अधिकार स्वाभाविक असल्याचे मानतात, परंतु आमचा विरोध देशद्रोह असल्याचे त्यांचे मानणे असल्याचा दावा स्टॅलिन यांनी गुरुवारी केला आहे.
जेव्हा तुम्हाला विशेषाधिकाराला सवय होते, तेव्हा समानता ही शोषणासारखी वाटू लागते. जेव्हा काही कट्टरवादी आम्हाला तामिळनाडूत तमिळांच्या योग्य स्थानाची मागणी करण्याच्या गुन्ह्यासाठी अंधराष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी ठरवतात, तेव्हा यासंबंधीची आठवण होते, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. गोडसेच्या विचारसरणीचे गुणगान करणारे हेच लोक द्रमुक आणि त्याच्या सरकारच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची हिंमत बाळगतात, परंतु द्रमुकनेच चिनी आक्रमण, बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि कारगिल युद्धादरम्यान सर्वाधिक देणगीचे योगदान दिले होते. तर दुसरीकडे महात्मा गांधी यांची हत्या करणारे त्यांचे वैचारिक पूर्वज आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
भाषिक समानतेची मागणी करणे अंधराष्ट्रवाद नाही. अंधराष्ट्रवाद कसा असतो हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? 140 कोटी नागरिकांवर शासन करणारे तीन फौजदारी कायद्यांना अशा भाषेत नाव देतात, जे तमिळ लोक वाचून बोलू किंवा समजू शकत नाहीत हा अंधराष्ट्रवाद आहे. देशात सर्वाधिक योगदान देणारा आणि नव्या शिक्षण धोरण नावाच्या विषाला गिळण्यास नकार दिल्यावर राज्याला त्याच्या वाट्याचा हिस्सा देण्यास नकार देत त्याला दुय्यम नागरिकासारखी वागणूक देणे अंधराष्ट्रवाद असल्याची टीका स्टॅलिन यांनी केली आहे. कुठलीही गोष्ट लादल्याने शत्रुत्व निर्माण होते. हे शत्रुत्व एकतेला धोक्यात आणते. याचमुळे खरे अंधराष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी हे हिंदीबद्दलचे कट्टरवादी असून ते स्वत:चा अधिकार स्वाभाविक आहे, परंतु आमचा विरोध देशद्रोह असल्याचे मानतात असे म्हणत स्टॅलिन यांनी केंद्र अन् एकप्रकारे भाजपला लक्ष्य केले आहे.
तीन भाषा धोरणावरून वाद
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाक्युद्ध सुरू आहे. मागील काही दिवसांत राष्ट्रीय शिक्षण धोरण तामिळनाडूत लागू करण्यास स्टॅलिन यांनी नकार दिल्यावर शिक्षणमंत्री प्रधान यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर स्टॅलिन हे केंद्र सरकार बळजबरीने राज्यावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत. तर हा आरोप केंद्र सरकारने फेटाळला आहे. स्टॅलिन यांनी आता उघडपणे केंद्र सरकारच्या विरोधात आघाडी उघडली असून याला पुढील वर्षी तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. स्टॅलिन हे राज्य सरकारच्या अपयशावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवू पाहत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.









