रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अगसगेसह या भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरळीत बसव्यवस्था केली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने बस सुरळीत सोडाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा अखंड कर्नाटक रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आला आहे. अगसगे भागातून शाळा, महाविद्यालयाला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या भागातून चलवेनहट्टी, हंदिगनूर, म्हाळेनट्टी, कुरिहाळ आदी गावातील नागरिकांसाठी मोजक्याच बसेस सोडल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सकाळच्यावेळी बस व्यवस्था सुरळीत असली तरी सायंकाळी 5 व 6 वाजता विशेष बस सोडण्यात यावी, अशी मागणी रयत संघटनेकडून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बसवराज पाटील, कलगौडा पाटील, वैजू लुम्याचे, प्रकाश लोहार, दुंडाप्पा होसपेट आदी उपस्थित होते.









