ग्रामस्थांची मागणी; पूरपरिस्थितीवर उपाययोजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
अतिवृष्टी होऊन ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुराने आरे (ता. करवीर) या गावातील 320 कुटूंबांच्या प्रापंचिक साहित्याबरोबरच घरांचेही नुकसान झाले होते. त्यावेळी या पूरपरिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून गावाच्या गायरानामध्ये प्लॉट देण्यासंदर्भात शासन व प्रशासनस्तरावर चर्चा झाली होती. त्यानुसार गायरानाच्या गट क्रमांक 170 मध्ये पुनर्वसनासाठी जमिन मिळावी, अशी मागणी सरपंच सागर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हंटले आहे की, 5 ऑगस्ट 2019 ते 15 ऑगस्ट 2019 या दरम्यान महाप्रलयकारी आलेल्या पुरामध्ये सुमारे 320 कुटुंबांच्या प्रापंचिक साहित्यासह घरे ही उध्वस्त झाली. गावातील तरुण सहकार्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी न होता सर्व गावातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. पूर ओसरल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, करवीरचे आमदार पी. एन. पाटील, तत्कालिन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह अधिकार्यांनी गावास प्रत्यक्ष भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली होती. यावेळी पूरपरिस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना म्हणून गावाच्या गायरान मध्ये प्लॉट देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. प्लॉट मिळण्यासंदर्भातील आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन ती शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. या संदर्भात विविध शासकीय अधिकायांना भेटी देऊन प्लॉट लवकरात लवकर मिळणे बाबत विनंती केली आहे. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सलग तीन वर्षे महापुराच्या धोक्याला आरे ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षीही महापूर आल्यास लोकांना राहण्यास जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ गाव सोडून बाहेर जाण्याच्या मनस्थितीत नाहीत. तसेच जनावरे बांधणेस जागा उपलब्ध नाही. तरी पूरग्रस्थ ग्रामस्थाना त्वरित प्लॉट मिळवून देणे बाबत योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा यावर्षी येणाया संभाव्य महापुरामुळे होणाया वित्त व जीवितहानीस शासन जबाबदार राहील.
यावेळी महेश पाटील, जयदीप मोहिते, एकनाथ गुरव, धनाजी गुरव, सुरेश चौगले, निवास पाटील, भरत मोहिते, शिवाजी पाटील, मारुती चौगले, हेमंत पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.