दयनीय अवस्थेमुळे रहिवाशांना त्रास : कुतिन्हे
मडगाव : मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी रातवाडो-मडगाव येथील रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेबद्दल संबंधित अधिकारिणींना फटकारले आहे. या रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले आहे. कुतिन्हो यांनी रहिवाशांना होणाऱ्या त्रासांची तुलना पणजीच्या स्मार्ट सिटीमधील समस्यांशी केली आहे. स्मार्ट सिटीतील बेशिस्त कामांमुळे पणजीचे लोक त्रस्त असताना मडगावच्या आमदारांच्या ‘मॉडेल मडगाव’ची परिस्थिती काही चांगली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. रातवाडो रस्ता मडगाव पालिकेमार्फत बांधण्यात आला होता आणि आज जर एखाद्याने या ठिकाणी भेट दिली, तर त्याला वाटेल की, येथे कोणताही रस्ता अस्तित्वात नाही आणि तो फक्त कच्चा रस्ता आहे.
मे महिन्यात मलनिस्सारण विभागाने मडगावच्या आमदारांच्या सांगण्यावरून येथे काम हाती घेतले होते. या रस्त्यावर सध्या दुचाकीचालक घसरत आहेत आणि आम्हाला लवकरच रस्ता दुऊस्त केला जाईल हे आश्वासन तेवढे मिळत आहे, असे सांगून स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. या रस्त्याची डागडुजी तातडीने करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या भागात आजारी असलेले लोक, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ऊग्णवाहिका बाजूलाच ठेवा, चारचाकी वाहन देखील आंत घेणे शक्य नाही. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे महिन्याभरापासून आमची वाहने मुख्य रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवावी लागत आहेत, असे फा. जॉन्सी कुलासो यांनी सांगितले. रोडरोलरचा वापर करून आणि योग्य रोबल सोलिंग करून हा रस्ता दुऊस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.









