उचगाव : बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील उचगाव फाटा ते बाचीजवळील कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या पट्ट्यामध्ये अनेक झाडांच्या फांद्या रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहतुकीला अडचण होत आहे. सदर फांद्या तातडीने काढण्यात याव्यात, अशी मागणी या भागातील प्रवासी व नागरिकांतून करण्यात येत आहे. उचगाव ते बाची या तीन किलोमीटर अंतराच्या भागांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठमोठे वृक्ष आहेत. या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर विखुरलेल्या असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर तसेच शिनोळी येथील इंडस्ट्रीज एरियामध्ये माल घेऊन जाणाऱ्या आणि येणाऱ्या व इतर मालवाहू वाहने माल भरून जात असताना या फांद्या वाहनाला लागून अपघात घडत आहेत.
तसेच या फांद्या केव्हाही रस्त्यावर कोसळून प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच तुरमुरी गावानजीक एक मोठा वृक्ष वाळलेला असून गेल्या अनेक महिन्यापासून सदर वृक्ष असाच आहे. या संदर्भात अनेकवेळा हा वृक्ष काढण्यात यावा, अशी विनंती करूनदेखील अद्याप हा वृक्ष काढलेला नाही. सदर वृक्ष जर रस्त्यावर कोसळला तर या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या एखाद्या प्रवाशावरती कोसळून मोठी दुर्घटनाही घडू शकते. यासाठी सदर वाळलेला वृक्षही तातडीने काढण्यात यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. यासाठी या रस्त्याच्या संबंधीत वनखात्याने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने याची दखल घेऊन या फांद्या हटवाव्यात आणि वाहतुकीला होणारी अडचण दूर करावी, अशी मागणी सर्व थरातून करण्यात येत आहे.









