वार्ताहर /किणये
हंगरगा-मंडोळी-सावगाव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.खड्यांचा वाहनधारकांना त्रास होऊ लागला आहे. तसेच सावगाव- मंडोळी व मंडोळी-हंगरगाजवळील पुलाजवळ अधिक प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून त्वरित खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील हंगरगा, सावगाव, मंडोळी गावांमधून सदर रस्त्यांवर वाहनधारकांची रोज मोठी वर्दळ असते. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रात्रीच्या वेळी खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
या तिन्ही गावातील संपर्क रस्त्यांवरून वाहनधारक शेतकरी व विद्यार्थी रोज ये-जा करतात. या खाड्यांमुळे वाहनधारक वैतागून गेलेले आहेत. रस्त्यांसाठी विविध प्रकारच्या योजना या भागात राबविल्या जात आहेत. मात्र या रस्त्यांवर काही ठिकाणी असलेले खड्डे बुजवण्याकडे प्रशासनाची दुर्लक्ष का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. सावगाव-मंडोळी या रस्त्याचे अलीकडेच डांबरीकरण करण्यात आले. तसेच नाल्यावरील पुलाच्या ठिकाणी खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. सदर पुलाजवळील रस्त्याचे कामकाज निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक करीत आहेत. यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती त्वरित करून घ्यावी- सचिन दळवी
मंडोळी पुलाजवळील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या ठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे अनेक वाहनधारकांचे अपघात घडत आहेत. मोठी दुर्घटना होण्याआधीच या ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. मंडोळी गावात रस्त्यावर असलेल्या खाड्यांमुळे गावातून ये-जा करणे मुश्किल बनले आहे. ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी.









