सदलगा विश्वगुरु बसव संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : सदलगा शहरातील बसवेश्वर चौकाच्या सुशोभिकरणासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. आठ महिन्याचा कालावधी उलटत आला तरी कंत्राटदाराकडून कोणतेच काम पूर्ण करण्यात आले नाही. कंत्राटदाराच्या विलंब धोरणाबद्दल कारवाई करून चौकाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन विश्वगुरु बसव संघ सदलगा यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदलगा येथील बसवेश्वर चौकातील रस्त्यासह इतर विकासकामांसाठी 2021-22 मध्ये विशेष निधीअंतर्गत 70 लाखापेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी वर्क ऑर्डरही झाली आहे. कामाचे कंत्राट मल्लाप्पा गुद्दगे या प्रथम दर्जा कंत्राटदाराला देण्यात आले आहे. आठ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी कोणतेच काम पूर्ण झाले नाही. यामुळे लिंगायत समाजाच्या आणि बसवतत्व अनुयायींना याचे अति दु:ख झाले आहे. याची तात्काळ दखल घेऊन विकासकामे त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.









