जीएसटी कपातीचा कंपन्यांना होणार लाभ : 22 सप्टेंबरपासून नवे दर अस्तित्वात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जीएसटी दरामध्ये नव्याने केलेल्या सुधारणांमुळे आगामी काळामध्ये एफएमसीजी क्षेत्रामध्ये तेजी येऊ शकते, असे संकेत व्यक्त केले जात आहेत. जीएसटी परिषदेने अलीकडेच 56 व्या बैठकीमध्ये अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 5 आणि 18 टक्के हे दोन दर जीएसटीचे घोषित केले आहेत. यापुढे 12 आणि 28 टक्के हे दर नसणार आहेत.
सदरचे नवे जीएसटी सुधारित दर हे 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. रोजच्या गरजेच्या वस्तूंवर जीएसटी दर कमी होणार असल्याने खरेदीमध्ये वाढ दिसू शकते. रोजच्या गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर आता 18 टक्क्यांवरून 5 टक्के इतका करण्यात आला आहे. म्हणजेच 13 टक्के इतका दर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात वेगाने विकल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तुंच्या मागणीत वाढ होणार आहे.
ब्रोकरेज फर्म नोमुराचे मत
विदेशातील ब्रोकरेज फर्म नोमुरा यांच्या मते हे उचललेले जीएसटी दरासंदर्भातील कपातीचे धोरण दैनंदिन वस्तूंच्या खरेदीमध्ये वाढीसाठी मदत करेल. यामध्ये एफएमसीजी क्षेत्रातील विविध मोठ्या कंपन्यांना येत्या काळामध्ये फायदा होऊ शकणार आहे. कोलगेट या कंपनी अंतर्गत टूथपेस्ट, टूथ ब्रश आणि पर्सनल वॉश सारख्या उत्पादनांवर आता 5 टक्के जीएसटी दर आकारला जाणार आहे. दुसरीकडे 80 टक्के बिस्किट विक्रीवर अवलंबून असणाऱ्या ब्रिटानिया हिलाही या जीएसटी दराचा लाभ उठवता येणार आहे. लवकरच त्यांची उत्पादनेही स्वस्त केली जातील. एफएमसीजी क्षेत्रातील आणखीन एक दिग्गज कंपनी नेस्ले इंडिया जीएसटी दर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
पादत्राणे स्वस्त
दुसरीकडे जीएसटी परिषदेने पादत्राणे आणि कापड उद्योगालाही दिलासा देण्याचे काम केलेले आहे. 2500 पर्यंतच्या पादत्राणांवर यापुढे 5 टक्के इतका जीएसटी दर आकारला जाणार आहे. याआधी हा दर 12 टक्के आकारला जात होता. नव्याने सुधारित कपातीत जीएसटी दर लागू केल्यानंतर ग्राहक चांगल्या आणि ब्रँडेड उत्पादनांच्या खरेदीकडे वळताना दिसणार आहेत. दीर्घकाळासाठी या साऱ्याचा लाभ संघटित कंपन्यांना अधिक मजबूत करण्यासाठी सहाय्यकारक ठरणार आहे.









