गुरुवारी आषाढी एकादशी : भक्तांकडून खरेदी
बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली आषाढी एकादशी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. विशेषत: साबुदाणे, वरी तांदूळ, शेंगदाणे, रताळी, शाबू चिवडा, राजगिरा लाडू, केळी, विविध फळे, खजूर आदींची खरेदी वाढली आहे. आषाढी एकादशीला वारकऱ्यांबरोबर उपवास धरणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना पसंती दिली जात आहे. वर्षभरातील महत्त्वाच्या उपवासांपैकी आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे वारकरी मंडळींसह आबालवृद्धांकडून उपवास केला जातो. त्यामुळे दिवसभर उपवासानिमित्त साबुदाणा, वरी, विविध फळे, रताळी आदी पदार्थांना पसंती दिली जाते. त्यामुळे या पदार्थांना बाजारात मागणी वाढू लागली आहे.
बाजारात साबुदाणा 80 रुपये किलो, वरी तांदूळ 110 रुपये किलो, साबु चिवडा 130 रुपये किलो, राजगिरा लाडू 20 रुपये पाकीट, शेंगदाणे 130 रुपये किलो, खजूर 300 रुपये किलो, केळी 60 रुपये डझन, केळी आंबा 100 रुपयांना तीन असा दर आहे. याबरोबरच सफरचंद, डाळींब, पेरू आदी फळांची देखील रेलचेल सुरू आहे. गुरुवारी आषाढी एकादशी आणि याच दिवशी बकरी ईद असल्याने मुस्लीम बांधवांकडूनही खरेदी केली जात आहे. बाजारात साबुदाणे, वरी तांदूळ, शेंगदाण्यांची विक्री अधिक प्रमाणात झाली. त्याबरोबरच विठ्ठल मंदिरांतून गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे देवस्थान कमिटीकडून विविध पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उपवासाच्या पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येकी दहा ते पंधरा रुपयांनी दर वाढले आहेत. साबुदाणा, वरी तांदूळ, शेंगदाण्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे जादाचे पैसे मोजावे लागत आहेत. विविध फळे आणि खारीकही महागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता आवाक्यात असलेल्या केळी खरेदीलाच पसंती देऊ लागली आहे.









