कनिष्ट महिला संघाच्या प्रशिक्षिका गीता चानू
वृत्तसंस्था/ रोहटक
भारतीय मुष्टियुद्ध क्षेत्राचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारण्यासाठी देशातील पुरूष आणि महिला मुष्टियोद्ध्यांसाठी सरावाचे शिबिर घेतले जात आहे. कनिष्ठ मुले आणि मुलींसाठी 15 दिवसांचे हे सराव शिबिर अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनतर्फे येथील साईच्या केंद्रामध्ये आयोजित केले होते. मंगळवारी या शिबिराचा समारोप झाला. सदर शिबिरात सहभागी झालेल्या कनिष्ठ महिला स्पर्धकांनी सदर शिबिराचा कालावधी किमान महिनाभर असावा अशी मागणी केली आहे. त्याचा फायदा स्पर्धकांना आपला दर्जा सुधारण्यासाठी होईल, असे मुष्टियुद्ध प्रशिक्षक गीता चानूने म्हटले आहे.
उझबेक, कझाकस्तान या दोन देशांचे मुष्टियोद्धे जागतिक दर्जाचे आहेत. या दोन देशांमध्ये मुष्टियुद्ध क्षेत्रात चांगले सहकार्य लाभत असल्याचे चित्र पहावयास मिळते. मध्य आशिया खंडातील कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे देश विविध वयोगटातील मुष्टियोद्ध्यांसाठी संयुक्त प्रशिक्षण सराव शिबिर आणि स्पर्धा वारंवार आयोजित करत असतात, असेही चानूने म्हटले आहे. रोहटकमध्ये झालेल्या या सराव शिबिरात 150 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये भारताचे 75 तर कझाकस्तानचे 37, उझबेकचे 18, लंकेचे 35 स्पर्धकांनी भाग घेतला होता. हे शिबिर साईच्या नव्या खेलो इंडिया उदयान्मुख शोधमोहिम अंतर्गत घेतले गेले.









