सावत्र पुत्र अन् पतीच्या मित्रांवर केला आरोप
वृत्तसंस्था/ पीलीभीत
स्वतःच्या सावत्र पुत्र आणि पतीच्या मित्रांवर बलात्काराचा आरोप करणाऱया एका महिलेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. न्यायाची आता कुणाकडूनच अपेक्षा राहिलेली नाही. पोलिसांनी कुठल्याही आरोपीला अटक केलेली नाही. यासंबंधी 9 ऑक्टोबर रोजी आपण तक्रार नोंदविली होती असे या महिलेने राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मला वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे 30 वर्षीय पीडितेने म्हटले आहे. या महिलेने घटस्फोटानंतर चंदीगड येथील एका घटस्फोटित व्यक्तीशी दुसरा विवाह केला होता. परंतु विवाहाच्या काही काळानंतर सावत्र पुत्र या महिलेचे लैंगिक शोषण करू लागला होता. त्यानंतर तिच्या पतीच्या मित्रांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रार करूनही पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचा दावा या महिलेने केला आहे.









