वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक दुचाकी घेण्याचे प्रमाण उपनगरी व ग्रामीण भागामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढले असल्याची माहिती श्रीराम सिटी युनियन फायनान्स यांनी नुकतीच दिली आहे.
एकंदर इतर दुचाकी विक्रीचा विचार करता विक्री कोरोनापूर्व स्तरावर अद्यापही पोहोचलेली आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमती अधिक असल्याने खरेदीदार आपली वाहन खरेदी सध्या तरी लांबणीवर टाकताना दिसत आहेत. परिणामी लोक आता इलेक्ट्रिक दुचाकी घेण्याकडे वळू लागले आहेत. यामध्ये ग्रामीण भाग तसेच उपनगरी भाग खरेदीमध्ये आघाडी घेताना दिसत असल्याचे श्रीराम सिटी युनियन फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ वाय. एस. चक्रवर्ती यांनी सांगितले. मोठय़ा शहरांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी घेतल्या जातातच. परंतु ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा आता नियमित असल्याने अनेक जण इलेक्ट्रिक दुचाकी घेत असल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली.
आगीमुळे खरेदी लांबणीवर
गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची किंमत सरासरी 20 टक्के इतकी वाढली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत 10 हजार इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली आहे. इलेक्ट्रिक दुचाकींना म्हणावा तसा प्रतिसाद वाढताना दिसत नाही. मध्यंतरी इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सरकारने इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांवर काही निर्बंध लादले होते. या घटना पाहूनच अनेकांनी इलेक्ट्रिक दुचाकी घेण्याचा निर्णय काहीसा लांबणीवर टाकल्याचे दिसून आले.
उत्पादन वाढवण्याची गरज
टायर टू आणि टायर थ्री शहरातील लोकही इलेक्ट्रिक दुचाकी घेत असून मागणीच्या तुलनेमध्ये उत्पादन मात्र पुरेसे घेतले जात नसल्याची बाबही चिंता वाढवत आहे. उत्पादन वाढवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. गेल्या जून महिन्यामध्ये दुचाकींची विक्री ही बऱयापैकी राहिली असली तरी कोरोनापूर्व परिस्थितीतील विक्रीचा आकडा गाठण्यात आलेला नाही.









