बेविनकोप्पच्या विजयानंद स्वामींचे निवेदन
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूरपासून इंचल क्रॉसपर्यंतच्या बेळगाव-रायचूर रस्त्यापर्यंत महामार्गाची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधी कायदा व संसदीय व्यवहार आणि पर्यटनमंत्री एच. के. पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. बेविनकोप्प येथील श्री विजयानंद स्वामीजी, निवृत्त अधीक्षक अभियंते रमेश जंगल, मलप्रभा मुख्य अभियंते अशोक वासनद, रमेश कोलकार, बसनगौडा कामनगौडर, डॉ. शिवनगौडा पाटील, नित्यानंद सेवा समितीचे फकिरप्पा हसरण्णावर, मल्लिकार्जुन पुजेर आदी यावेळी उपस्थित होते. गदग येथे एच. के. पाटील यांची भेट घेऊन स्वामीजींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले. मलप्रभा नदीवर संगोळ्ळीजवळ पूल उभारण्याच्या कामाला विलंब होत आहे. त्याला गती द्यावी. आनंद आश्रमाला सांस्कृतिक भवन व यात्री निवास उभारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.









